सोलापूर : वृत्तपत्रे ही माणसांचा श्वास अन् संजीवनी आहेत. पत्रकारांनी आपले आरोग्य जपले पाहिजे. ज्यावेळी निराशजनक स्थिती वाटेल तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सकारात्मक दृष्टिकोन आठवावा. त्यामुळे जीवनात त्रास जाणवणार नाही, असे प्रतिपादन शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांनी येथे केले.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आज शिवस्मारक सभागृहात पत्रकार दिनानिमित्त पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सन्मान सोहळा डॉ. शिवरत्न शेटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रशांत जोशी, दैनिक दिव्य मराठीचे संपादक महेश रामदासी, दैनिक सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील, दैनिक एकमतचे संपादक संजय येऊलकर, दैनिक तरुण भारत संवादचे संपादक विजयकुमार देशपांडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत, इन सोलापूर न्यूज चॅनलचे चॅनेल प्रमुख समाधान वाघमोडे, श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर कव्हेकर, दशरथ वडतिले, राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. शेटे पुढे म्हणाले, वृत्तपत्रांचा खप कमी अधिक होऊ शकतो पण ते कधीच संपणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत पत्रकारांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. धकाधकीच्या जीवनात त्याकडे दुर्लक्ष होते.

संपादक सिद्धाराम पाटील यांनी कालची आणि आजची अत्याधुनिक पत्रकारिता यावर भाष्य केले. सद्यस्थितीत ए.आय. तंत्रज्ञान अधिक विकसित होत आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माध्यमांमध्ये मोठा बदल होणार आहे. ते बदल आता स्वीकारले पाहिजे, असे ते म्हणाले. प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे खजिनदार किरण बनसोडे यांनी केले. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर संघाचे उपाध्यक्ष आफताब शेख यांनी आभार मानले. याप्रसंगी विविध माध्यमांचे पत्रकार, कॅमेरामन मोठ्या संख्येने उपस्थित होते.












