सोलापूर : तालुक्यातील कौठाळी येथील सोलार प्लांटवर झालेली मोठी चोरी उघडकीस आणण्यात सोलापूर तालुका पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून चोरीचा माल आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण १० लाख ७८ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कौठाळी (ता. उत्तर सोलापूर) ते वैराग जाणाऱ्या रोडवर पुरुषोत्तम प्रोफाईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सोलार प्लेट वीज निर्मितीचे काम सुरू आहे. या साइटवरून २३ नोव्हेंबर २०२५ ते १८ जानेवारी २०२६ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी ८ लाख ७८ हजार १९० रुपये किमतीच्या सोलार प्लेट्स आणि पॅनल स्ट्रक्चरचे अँगल्स चोरून नेले होते. याप्रकरणी आदित्य भाऊसाहेब जाधव यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.



गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ही चोरी कौठाळी येथीलच काही स्थानिक इसमांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक अनंत चमके आणि पथकाने कौठाळी परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपींनी पोलिसांचा खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेल्या ७ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या ‘गौतम’ कंपनीच्या १०२ सोलार प्लेट्स, १ लाख १३ हजार १९० रुपयांचे १४७ धातूचे अँगल्स आणि चोरीसाठी वापरलेले २ लाख रुपये किमतीचे अशोक लेलँड कंपनीचे ‘दोस्त’ मॉडेलचे वाहन, असा एकूण १० लाख ७८ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, पोहवा राहुल महिंद्रकर, पोना अनंत चमके, लालसिंग राठोड, पैगंबर नदाफ, वैभव सूर्यवंशी आणि सागर शिवे यांनी केली.










