बंडा प्रशालेच्या मुख्याध्यापकावर शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिले सेवा समाप्तीचे आदेश
सोलापूर: शहरातील श्री कुरुहिनशेट्टी ज्ञाती संस्था संचलित, श्रीमती नरसम्मा बसप्पा बंडा प्रशालेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील मुख्याध्यापक एम. डी. बिराजदार यांच्यावर एका महिला शिक्षिकेचा लैंगिक छळ आणि विनयभंग केल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, संबंधित मुख्याध्यापकाची सेवा तात्काळ समाप्त करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. तक्रारदार महिला शिक्षिका गेल्या १३ वर्षांपासून या शाळेत कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, मुख्याध्यापक बिराजदार हे गेल्या दीड वर्षांपासून त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. यामध्ये खालील गंभीर आरोपांचा समावेश आहे. केबिनमध्ये एकटे बोलावून शारीरिक टिप्पणी करणे, रात्री-अपरात्री व्हिडिओ कॉल करून अश्लील हावभाव करणे आणि व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज पाठवणे.
कामावरून काढून टाकण्याची धमकी देणे आणि वर्गात शिकवत असताना एकटक पाहून मानहानी करणे. केबिनमध्ये स्वतःच्या खुर्ची शेजारी खेटून बसण्याचा हट्ट धरणे व शारीरिक बळजबरी करण्याचा प्रयत्न करणे.पोलीस कारवाई आणि कायदेशीर पेचया त्रासाला कंटाळून पीडित शिक्षिकेने सदर बाजार पोलीस स्टेशन येथे धाव घेतली असून, त्यांच्या तक्रारीवरून एफ.आय.आर. क्र. ००३२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्याध्यापकांच्या या वागणुकीमुळे आपली प्रकृती खालावली असून जीविताला धोका असल्याची भीतीही पीडितेने व्यक्त केली आहे.
सेवा समाप्तीचे आदेश : या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग (१३ मे २०२५) मधील तरतुदींनुसार, दोषी मुख्याध्यापकावर कठोर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. संस्थेच्या अध्यक्षांना आणि सचिवांना कळविण्यात आले आहे की, बिराजदार यांची सेवा तात्काळ समाप्त करून तसा अहवाल सादर करावा. या प्रक्रियेत विलंब झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संस्थेवर राहील, असा इशाराही प्रशासकीय स्तरावरून देण्यात आला आहे.










