सोलापूर : सोलापूर शहरातील बस सेवा अनेक दिवसांपासून बंद आहे. महापालिकेच्या तोडक्या बस सेवेमुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. याचा फायदा शहरातील बेकायदा रिक्षाधारक घेत आहेत. तत्काळ सिटीबस सेवा सुधारणा करावी, अशी मागणी सोमवारी झालेल्या महापालिकेच्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने जनता दरबारात करण्यात आली. महापालिका आतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या उपस्थित महापालिकेचा जनता दरबार पार पडला. या दरबारात अनेक नागरिकांनी तक्रारीचा पाढा वाचला. जनता दरबारात संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर शहरातील सिटी बस सेवा सुरु करण्याचे साकडे घालण्यात आले. अनेक वर्षापासून शहरात बऱ्याच ठिकाणी सिटी बसेस बंद आहेत.
सोलापूर हे यंत्रमाग कामगारांचे शहर आहे. आपल्या शहरात मोठे एमआयडीसी आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या शहरात रोजंदारीने काम करणारे मजूर राहतात. कामावर जाण्यासाठी सिटी बस सेवा सोईची आहे. मात्र सिटी बस सेवा बंद असल्याने रिक्षाने प्रवास करावा लागतो व रिक्षावाले सिटी बसच्या तुलनेत दुप्पट तिप्पट भाडे आकारणी करतात. प्रवासाच्या सोईसाठी शहरातील सिटबस सेवा सुरू करण्याची मागणीचे निवेदन जनता दरबारात देण्यात आले.
यावेळी संभाजी भोसले, शिरीष जगदाळे, मिनल दास, अॅड. गणेश कदम, जयश्री जाधव, मनीषा कोळी, संजीवनी सलबत्ते, सुनिता घंटे, शेखर भोसले, संतोष सुरवसे, सिद्धाराम सावळे, सतीश वावरे, सुनंदा सूर्यवंशी, सुनीता कारंडे पदाधिकारी उपस्थित होते
