मुंबई : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत केवळ तारखांची घोषणाच नव्हे, तर आरक्षणासंदर्भातील अंतिम स्थिती किंवा निवडणुकीच्या तयारीतील अन्य प्रशासकीय टप्प्यांबद्दलही महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.

राज्यातील जवळपास 15 हून अधिक महापालिका, मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे यांसारख्या प्रमुख शहरांसह सुमारे 25 जिल्हा परिषदा आणि 248 पंचायत समित्यांच्या निवडणुका विविध कारणांमुळे अनेक महिन्यांपासून रखडल्या आहेत. ओबीसी आरक्षणाचा तिढा, वॉर्ड रचनेतील बदल आणि प्रशासकीय अडचणींमुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांवर सध्या प्रशासकीय राजवट लागू आहे. प्रशासक राजवटीमुळे लोकप्रतिनिधींना आपले हक्क बजावता येत नाहीत, या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी सरकारवर सातत्याने टीका केली आहे.
निवडणुकांचे अंतिम वेळापत्रक अपेक्षित
आज दुपारी 4 वाजता होणाऱ्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांसंदर्भात मोठे निर्णय जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. निवडणूक आयोग आतापर्यंत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेत होता; मात्र आता सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि प्रशासकीय तयारी पूर्ण झाल्यानंतर आयोगाकडून निवडणुकांचा अंतिम कार्यक्रम घोषित केला जाण्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मतदार याद्या अद्ययावत करणे, निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि सुरक्षा व्यवस्था पूर्ण झाल्याचे संकेत मिळत आहेत.







