सोलापूर : हॉस्टेलमध्ये राहून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाने खोलीतच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तळेहिप्परगा (ता. उत्तर सोलापूर) परिसरातील ऑर्किड कॉलेज येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आलीविद्याधर प्रकाश शिंदे (वय २० रा. सात्रा ता.कळंब जि.धाराशिव) असे मयत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो ऑर्किड कॉलेजच्या बॉईज हॉस्टेल (रूम नं. ४०८) मध्ये राहण्यास होता. गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्याच्या वडिलांनी फोन लावले होते. मात्र तो फोन उचलत नव्हता. तेंव्हा त्यांनी कॉलेजच्या वॉर्डनला यासंदर्भात विचारणा केली. तेंव्हा वामन पवार यांनी खोली जवळ जाऊन पाहिले असता आतून दरवाजा बंद होता.
त्यानंतर त्याने खिडकीतून डोकावले असता विद्याधर शिंदे हा छताच्या पंख्याला दोरीच्या सहाय्याने लटकत असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी याची माहिती तालुका पोलिसांना कळवली.तेव्हा फौजदार महेश घोडके यांच्यासह त्यांच्या पथकाने कॉलेजमध्ये जाऊन रुमचा दरवाजा उचकटला. तेव्हा विद्याधरचा मृतदेह छताच्या पंख्याला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे पाठवून दिले.मयत विद्याधर शिंदे हा दुसऱ्या इंजिनिअरिंगच्या वर्षात शिकत होता. त्याच्या खोलीत एकूण चार विद्यार्थी राहण्यास होते.
वेळ अमावस्या असल्यामुळे इतर तीन विद्यार्थी गावाकडे गेले होते. त्यामुळे विद्याधर शिंदे हा एकटाच हॉस्टेलच्या रूममध्ये होता. तो देखील शुक्रवारी गावाकडे जाणार होता. मयत विद्याधर शिंदे यांच्या पश्चात आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. त्याचे वडील हे प्राथमिक शिक्षक असल्याचे पोलिसाकडून सांगण्यात आले. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून या मागचे कारण मात्र अद्याप समजले नाही. पुढील तपास फौजदार महेश घोडके करीत आहेत.










