सोलापूर : धनत्रयोदशीचा मुहूर्त साधून सोलापूर शहरातील विविध व्यापारी वर्गाने खतावणी, रोजमेळ, जमानावे, देशी खतावणी, इंग्लिश खतावणी, छापील खतावणी,कापडी कोयर बुक,पोणिया, मार्केट बुक, लेटर बुक, लक्ष्मी वही यांची पारंपरिक पद्धतीने धने,गुळ खायला देऊन खरेदी विक्रीची परंपरा कायम ठेवली.
व्यापार असो अथवा संसार आज दररोजचा हिशोब ठेवावाच लागतो. त्याशिवाय आपला मेळ बसतच नाही. आज जरी संगणक युग असला तरी व्यापारी वर्गाची ओढ रोजमेळ व खतावणीकडे कायम आहे. व्यापार कोणताही असो आपला रोजचा व्यवहारिक ताळमेळ व्यापारी रोजमेळमध्ये नोंद केल्यानंतरच समजतो. व्यापारी आपला व्यवहार डायरेक्ट संगणकावर करू शकत नाही. त्यासाठी आधी रोजमेळ लागतो. नंतर रोजमेळ वरून खतावणी वर त्याची नोंद होते.त्यामुळे आपला हिशोब लगेच सापडतो.

दरम्यान, अडत व्यापारी, किराणा भुसार व्यापारी,कापड दुकानं,सराफ व्यापारी व छोटे मोठे व्यापारी अशा वह्या वापरतात. श्रावण हा पवित्र महिना समजला जातो. म्हणून या कामाची सुरुवात श्रावण महिन्यापासून होतो.बाहेरगावचे व्यापारी आपली वह्यांची ऑर्डर श्रावण महिन्यात तर गावातील व्यापारी दसऱ्याच्या मुहूर्तावर ऑर्डर नोंदवून धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर खरेदी केल्याचे चित्र यावेळी बाजारपेठेत दिसून आले.व्यापारी वह्यांनाच आपली लक्ष्मी मानतात म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी धने, गूळ खाऊन खरेदी केलेले वह्यांचा गठ्ठा आपल्या डोक्यावर घेऊन जाण्याची परंपरा आजही टिकून असल्याचे दिसून येत आहे.








