मुंबई : उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा पुढील आठवड्यात होईल, अशी माहिती मंगळवारी सकाळी खासदार संजय राऊत यांनी दिली. दरम्यान, महापालिका निवडणुका घोषित होताच मुंबईतल्या राजकीय घडामोडींना वेग आलाय. पत्रकार परिषद संपताच संजय राऊत हे राज ठाकरे यांची भेट घ्यायला शिवतीर्थावर पोहचले. या दोन्ही नेत्यांत आगामी निवडणुका एकत्र लढवण्याबाबत सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होताच राज्याच्या राजकारणात प्रचंड हालचालींना वेग आला आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरी भागात होणाऱ्या या निवडणुकांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार असल्याची घोषणा केल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये उत्साह संचारला असला, तरी या घोषणेनंतर लगेचच वादालाही तोंड फुटलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर थेट पक्षपातीपणाचा आरोप करत आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. माध्यमांशी बोलताना राऊत यांनी केवळ निवडणूक प्रक्रियेवरच नव्हे, तर मुंबईतील मराठी माणसाच्या अस्तित्वाशी संबंधित मुद्द्यांवरही आक्रमक भूमिका मांडली.
आपल्या प्रकृतीविषयी विचारण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी निवडणुकीच्या घोषणेमुळे उत्साह वाढल्याचं सांगितलं. महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे तब्येतही सुधारली पाहिजे. मी उद्धव ठाकरे यांची परवानगी घेऊन आज तुमच्यासमोर उभा आहे, असं म्हणत त्यांनी या लढ्याचं स्वरूप स्पष्ट केलं. ही लढाई केवळ निवडणुकीची नसून, मुंबईची आणि मराठी माणसाच्या अस्तित्वाची शेवटची लढाई, असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईसाठी झालेल्या संघर्षाची आठवण करून देत, कोणत्याही पदावर असलेला मराठी माणूस या लढ्यात उतरला पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गटाने निवडणुकांना अस्मितेचा रंग दिल्याचं स्पष्ट झालं आहे.







