सोलापूर : शहरातील सराफ व्यापाऱ्यांच्या सुवर्णपेढ्या, त्यांची निवासस्थाने, कार्यालये, भागीदार आणि त्यांची मालकी असलेल्या इतर उद्योगांमध्ये बुधवारी आयकर विभागाने छापे टाकले. दिवसभर आणि रात्री उशिराही तपासणीचे काम सुरू होते. गुरुवारीही अधिकारी ठाण मांडलेले होते. खरेदी विक्रीची बिले, बँकेतील व्यवहार आणि सरकारी देयरकमांवर पथकातील आयटी तज्ञांची मदत घेण्यात आली. गुरुवारी सर्व पेढ्यातील डेटा आणि त्याचे तांत्रिक विश्लेषणाचे काम सुरू होते, असे सूत्रांनी सांगितले.
सराफ व्यापाऱ्यांसह बांधकाम व्यावसायिक, सम्राट चौकातील एक वकील यांच्या कार्यालयांवरही छाप टाकण्यात आले होते. गुरुवारी तिथेही तपास सुरूच होता. मधला मारुती, जुने विठ्ठल मंदिर व सात रस्ता, सम्राट चौक या ठिकाणच्या त्यांच्या आस्थापना, निवासस्थानांवर पोलिस बंदोबस्त होता. दुपारी चारच्या सुमारास सातरस्ता येथील आपटे ज्वेलर्सची पाहणी केली असता त्या दालनातील तीन-चार सुरक्षारक्षक बाहेरील बाजूस बसलेले दिसले. पोर्चमध्ये एक पोलिस अंमलदार बंदोबस्तासाठी होता. आत आयकर अधिकारी आणि कर्मचारी तपास करत होते. मधला मारुती येथील नारायणपेठकर ज्वेलर्सच्या बाहेरही पोलिसांचा बंदोबस्त होता. उत्तर कसब्यातील नारायणपेठकर यांच्या जुन्या घरीदेखील तपासणी सुरू होती. शुक्रवारीही अधिकाऱ्यांचा मुक्काम असेल, असेही सूत्र म्हणाले…
सराफ व्यापार ते रिअल इस्टेट हेच पथकांचे मुख्य लक्ष्य होते
आपटे यांच्या सराफी पेढ्या, त्यांचा बांधकाम व्यवसाय, अंत्रोळी (ता. दक्षिण सोलापूर) येथील दूध डेअरी हेच पथकांचे लक्ष्य होते. या सर्व ठिकाणी गुरुवारी तपासणी सुरू होती. त्याच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त होता. आपटेंच्या या सर्व पसाऱ्यातील आर्थिक व्यवहारांची कसून तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आले. अधिकाऱ्यांचा मुक्काम शुक्रवारीही राहील, असे सांगण्यात आले.







