सोलार ; जन्म-मृत्यू नोंदणी विभागात १६ हजार अर्ज प्रलंबित आहेत. विवाह नोंदणीची वेबसाईट बंद आहे. यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी शनिवारी अचानक या विभागाला भेट दिली. कामाचा आढावा घेतला. त्यानंतर म्हणाले, ‘गरज पडल्यास शनिवारी, रविवारी कामावर या. पण महिन्याभरात सर्व अर्जाचा निपटारा करा. विनाकारण अर्ज प्रलंबित राहिल्यास कारवाई करू, अशी माहिती आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली

विवाह नोंदणी वेबसाईट २ नोव्हेंबरपासून बंद आहे. राज्यभर अशीच अवस्था आहे. त्यामुळे ४५ अर्ज प्रलंबित आहेत. त्यासाठी नागरिक दररोज हेलपाटे मारतात. त्यांना वेबसाईट कधी सुरु होणार याचे उत्तर मिळत नाही. तसेच जन्म-मृत्यू विभागात आलेल्या नागरिकांना उद्धट वागणूक दिली जाते. अर्जावर वेळेत निर्णय होत नाही. याचा गैरफायदा एजंट घेतात आणि त्यांच्यामार्फत कामे लवकर होतात, असा काही नागरीकांचा आरोप आहे. याचीही डॉ. ओम्बासे यांनी दखल घेतली. प्रत्येक टेबलला जाऊन प्रत्येकाचा आढावा घेतला. अर्ज किती आले आहेत, किती प्रलंबित, का प्रलंबित ? याची कारणे विचारली. यानंतर जलद गतीने प्रकरणांचा निपटारा करा, अशा सूचना दिल्या








