सोलापूर : विशेष तपासणी पथकांकडून सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आलेल्या वैयक्तिक मान्यतेची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत. विशेष तपासणी पथकाकडून मंगळवारी (दि.2) माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात तक्रारी असलेल्या वैयक्तिक मान्यतेची तपासणी एसआयटी प्रमुख कैलास दातकीळ यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यामुळे चुकीच्या वैयक्तिक मान्यता घेतलेल्या शिक्षक, शिक्षकत्तेर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, मारुती फडके, स्मिता पाटील यांच्यासह अनेक शिक्षणाधिकाऱ्यांनी चुकीच्या मान्यता दिल्याचा आरोप विविध संघटनासह शिक्षकांनी केल्या होत्या. त्या अनुषंगाने तपासणी होत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याविषयी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना विचारले असता, तक्रारीच्या अनुषंगाने सुनावणी घेऊन तक्रारी निपटारा लावण्यासाठी विशेष तपसणी पथक आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे एसआयटी पथक नेमके कशासाठी आले होते, असा सवाल शिक्षकांतून विचारला जात आहे.
माध्यमिकला कुलूप लावल्याची चर्चा
माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयास एका महिलेनी कुलूप लावले. त्यानंतर ती महिला बाहेर गेल्यानंतर लगेच कुलूप तोडण्यात आले आहे. मात्र, त्या महिलेंनी कोणत्या कारणासाठी माध्यमिक शिक्षण विभागाला कुलूप लावले, याची माहिती मिळाली नाही. याविषयी शिक्षण विभागाला विचारले असता, अशी घटनाच घडली नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे.
