सोलापूर : आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सोलापूर शहरातील सर्व १०२ प्रभागांमध्ये पक्षाचे उमेदवार देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे यंदाच्या वर्षी अबकी बार पन्नास पार हा नारा आमचा असणार आहे. महायुती किंवा स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत. असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केले.

पुढे ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत आम्ही महायुती धर्म पाळून भाजपचे कार्य केले. आता भाजपने युती धर्म पाळून महापालिका निवडणुकीत घटक पक्षाला सहकार्य करावे, अन्यथा आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. आज आमच्या पक्षात प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, विष्णू निकंबे, चंद्रकांत दायमा यांसह अनेकांचा पक्षाच्या विकासाला हातभार लागणार आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा आमच्या पक्षाला होणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. तत्पूर्वी शरद पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या सुधीर खरटमल, चंद्रकांत दायमा, विष्णू निकंबे, महेश गाडेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश तसेच स्वागत समारंभ संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश झाला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील छोट्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न असणार आहे. या निवडणुकीत सर्वात जास्त तरुणांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
– सुधीर खरटमल







