कासेगाव : हलगीचा आवाज, ढोल–ताशांचा नाद आणि नटलेल्या म्हशींचा थाट, असं देखणं दृश्य कासेगावात अनुभवायला मिळालं. निमित्त होतं दिवाळी पाडव्याचं. रंगीबेरंगी मोरपीस, चांदी–सोनेरी तोडे, कवड्यांच्या माळा आणि घुंगरांच्या चाळांनी सजलेल्या या डौलदार म्हशींनी संपूर्ण गावात उत्साहाची उधळण केली. जणू काही कासेगावच्या रस्त्यांवर म्हशींचा फॅशन शोच रंगला होता.
वर्षानुवर्षे चालत आलेली ही अनोखी परंपरा म्हणजेच ‘म्हशी पळविणे उत्सव’ — याचा अनुभव घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. म्हशींचे मालक आपल्या लाडक्या जनावरांना सजवून अभिमानाने मिरवत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि जनावरांवरील माया स्पष्ट जाणवत होती.

म्हैस मालक सांगतात, “हा उत्सव म्हणजे आपल्या म्हशींचा सन्मान करण्याचा दिवस. वर्षभर घरासाठी, दुधासाठी मेहनत घेणाऱ्या या जनावरांच्या सेवेला सलाम करण्याचा हा क्षण आहे.” दिवाळीपूर्वी म्हशींना विशेष प्रशिक्षण, पौष्टिक खुराक आणि धावण्याचा सराव दिला जातो.
दिवाळी पाडव्याच्या या पारंपरिक म्हशी उत्सवाने कासेगावची ग्रामीण संस्कृती, परंपरा आणि गवळी समाजाचे पशुप्रेम पुन्हा एकदा उजळून निघाले. हा सोहळा पाहण्यासाठी सोलापूर, तुळजापूर, बोरामणी, उळे, वरळेगाव, गंगेवाडी, वडजी, हगलूर, तळे, हिप्परगा, धोत्री, खडकी आदी गावांमधून नागरिकांनी उत्साहात गर्दी केली होती.







