सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजपने जिल्हा परिषदेच्या सहापैकी पाच जागा तर पंचायत समितीच्या १२ पैकी ११ जागा जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. शिवसेना शिंदे गटाने जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रत्येकी एक जागा जिंकली. एक ही जागा जिंकता न आल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व संपले.३ जिल्हा परिषद व ६ पंचायत समितीचे सदस्य आमदार कल्याणशेट्टी यांना मानणारे आहेत. तर आमदार सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघातील दोन जागा शिवसेनेने जिंकल्या.

मंद्रुपमध्ये भाजपचाच पण आमदार कल्याणशेट्टी व माजी आमदार माने समर्थक सदस्य विजयी झाला.बोरामणी, कुंभारी व वळसंग या तीनही गट व गणात भाजपचे उमेदवार विजयी झाले. बोरामणी गटात भाजपचे नेताजी खंडागळे ८४५ मतांनी विजयी झाले. मात्र या गटात काँग्रेसच्या उमेदवाराचा फटका शिवसेनेला बसला. वळसंग गटातून भाजपचे रामप्पा चिवडशेट्टी तर त्यांची मुलगी स्वाती बिराजदार धोत्री गणातून विजयी झाल्या. वडील व लेक दोघेही विजयी झाले हे यांनी निकालाचे वेगळेपण आहे.हत्तूर गटामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना यांच्यात चुरशीची लढत झाल्याचे निकालातून दिसले.

शिवसेनेचे माजी आमदार रतिकांत पाटील यांच्या पत्नी लक्ष्मी पाटील या अवघ्या ३४ मतांनी विजयी झाल्या. त्यांनी डॉ. उज्वला हविनाळे यांचा पराभव केला. तर हत्तुर व औराद पंचायत समितीची जागा भाजपने जिंकली. या गटात उमेदवारी देण्यावरून भाजपा अंतर्गत आमदार देशमुख व माजी आमदार माने यांच्यात कुरघोडी झाल्या होत्या.











