सोलापूर : हिंदू परंपरेनुसार तुळशी विवाहानंतर लग्नाचे मुहूर्त सुरू होतात. उपवर वधू-वर, पालक व नातेसंबंधीय लग्नसोहळ्याच्या तयारीत सज्ज असतात. मात्र, यंदा शुब्द मुहूर्त कमी असल्यामुळे लग्नाळूना सावधान रहावे लागणार आहे. मोजक्या तिथींमध्येच शुभमंगल पार पाडावे लागणार आहे. कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशी ते पौर्णिमा या काळात तुळशी विवाह होतात. यानुसार यंदा २ ते ५ नोव्हेंबर हा तुळशी विवाहाचा कालावधी आहे. त्यानंतर चातुर्मासामुळे लग्नसोहळे थांबतात. सूर्याचा वृश्चिक राशीत प्रवेश १६ नोव्हेंबरला होतो. पण, त्रयोदशी, चतुर्दशी व अमावस्येमुळे पहिला शुब्द लग्न मुहूर्त थेट २२ नोव्हेंबरला आहे.
एरवी तुळशी विवाहानंतर तात्काळ लग्नांची लगबग सुरू होते; मात्र यंदा १५ दिवस उशीर होणार असल्याने विवाह नोंदणी, मंडप, लॉन्स, केटरींग आदींच्या तयारीत बदल करावे लागतील नोव्हेंबरमध्ये २२, २३, २५, २६, २७, ३० तर डिसेंबरमध्ये २, ५ या तारखेला लग्न मुहुर्त आहेत. यानंतर १४ डिसेंबर ते ३० जानेवारी या काळात शुक्र अस्त असल्याने एकही लग्नमुहूर्त नाही. पुढील मुहूर्त ३ फेब्रुवारीपासून १६ मार्चपर्यंत तर नववर्ष (गुढीपाडव्यापासून) २१ एप्रिल ते ११ जुलै २०२६ पर्यंत आहेत.

मुहूर्त कमी
यावर्षी नोव्हेंबर ते जूनदरम्यान शुद्ध मुहूर्त कमी आहेत. ऑक्टोबर २०२६ पासून त्रिखंडात्मक सिंहस्थ सुरु होत असल्याने पुढील दोन-तीन वर्षेही शुद्ध मुहूर्त मर्यादित राहतील.
ओंकार मोहन दाते, पंचांगकर्ते, सोलापूर







