सोलपूर ; महापालिका निवडणुकीत 87 जागा घेऊन भाजपने सोलापुरात इतिहास रचला. आता महापौर कोण याची उत्सुकता लागून राहिली. त्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या गटातील विनायक कोंड्याल, प्रथमेश कोठे यांच्या नावांची चर्चा आहे. दुसरीकडे आमदार विजयकुमार देशमुख गटाचे किरण देशमुख, अनंत जाधव, अमर पुदाले, राजश्री कणके, शिवानंद पाटील यांच्या नावांची चर्चाही सुरू झाली आहे.पक्षीय पातळीवरच त्याचा निर्णय होईल. परंतु भाजपमध्ये आता दोन गट कायम असतील. एक कोठे गट आणि दुसरा देशमुख गट. त्यामुळे महापौर कोठे गटाचा की देशमुख गटाचा याची उत्सुकता लागली आहे. कोठे गटाच्या सर्वाधिक जागा आल्याने त्यांच्याच गटाला महापौर पदाची संधी मिळेल, असे सांगण्यात येते. तसे झाल्यास कोठे यांचे भाऊजी विनायक कोंड्याल अथवा त्यांचे चुलत बंधू प्रथमेश कोठे यांची वर्णी शक्य आहे. नाराज देशमुखांना जवळ करण्याच्या हेतूने काही हालचाली झाल्यास डॉ. किरण देशमुख, अमर पुदाले, राजश्री कणके, शिवानंद पाटील आणि अनंत जाधव यांच्या नावांचा विचार होऊ शकेल.
पालकमंत्री घेणार उद्या बैठक
पालकमंत्री जयकुमार गोरे सोमवारी (ता. 19) सोलापुरात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत नूतन नगरसेवकांची बैठक होईल. सर्वांचा सत्कार, संवाद असा कार्यक्रम आयोजित केला आहे.
नरेंद्र काळे : पक्षात उत्तम संघटक, हिंदुत्वाचा चेहरा. विरोधी पक्षनेत्याचा अनुभव, अभ्यासपूर्ण मुद्दे आणि प्रभावी चेहरा.
प्रथमेश कोठे : माजी महापौर स्व. महेश कोठे यांचे चिरंजीव. आमदार कोठे यांच्या शब्दावरून भाजपमध्ये आले.
किरण देशमुख : उच्च शिक्षित, भाजप युवा मोर्चाचे पद सांभाळले होते. गेली पाच वर्षे नगरसेवक म्हणून उत्तम कामगिरी.
विनायक कोंड्याल : सर्वाधिक मतांनी विजयी. तीनवेळा सलग निवडून आले. आमदार देवेंद्र कोठे यांचे समर्थक.
महापौर निवासही तयारीत
रेल्वेलाइन्स परिसरातील महापौर बंगल्यातही काही कामे करण्यात आली. प्रशासकीय कारकिर्दीत आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे काही काळासाठी या बंगल्यात वास्तव्यास होते. नव्या महापौरांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार काही कामे होणार आहेत.










