सोलापूर : सावळ्या विठ्ठलाचे भक्त असलेल्या वारकऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून सोलापूरसह सांगली, सातारा, पुणे व अन्य विभागीय कार्यालयाच्या वतीने राज्यातील विविध मार्गावरून 550 एसटी बसेस धावणार आहेत. तर सोलापूर विभागीय कार्यालयाच्या वतीने विविध नऊ आगारातून 150 जादा बसेस वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावतील.
कार्तिकीच्या एकादशी करिता पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या राज्यातील वारकरी भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे. कार्तिकी एकादशी ही उद्या बुधवार 29 आक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. रविवार हा एकादशीचा मुख्य दिवस असणार आहे. तर पौर्णिमा बुधवार रोजी आहे. राज्यातील सर्वच विभागातून महामंडळाच्या अतिरिक्त वाढीव बसेस धावणार आहेत. कार्तिकीसाठीसुध्दा राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी वाढीव एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्वच मार्गावरून वारकऱ्यांची ने आण केली जाईल. शिवाय, वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक मार्गावर जादा बसेसही सोडण्यात येणार आहे.
पुणे-मुंबईसह विविध आगारांतून जादा बसेसची सोय
एकादशीच्या कालावधीत सोलापूर विभागातून सोलापूर – बार्शी, पंढरपूर- मंगळवेढा, पंढरपूर -अक्कलकोट आदी आगारातून बसेसची सोय केली आहे. शिवाय, पंढरपूर -शिखर शिंगणापूर या मार्गावर जादा बसेस सोडलेले आहेत. तसेच पंढरपूर -पुणे, पंढरपूर -मुंबईसह अन्य अन्य महत्त्वाच्या मार्गांवर प्रथमच कार्तिकीसाठी बस सेवा उपलब्ध केली जाणार आहे.







