सोलापूर – पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहरच्या वतीने ७३ पोलीस शिपाई रिक्त पदांसाठी पोलीस मुख्यालय येथे ८८६ (६५५ पुरुष व २३१ महिला) उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले. या सर्वांची लेखी परीक्षा ही दि.१५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ ते १२.३० या कालावधीत एस.व्ही.सी.एस. हायस्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज, एमआयडीसी, अक्कलकोट रोड, सोलापूर येथे घेण्यात येणार आहे.
लेखी परिक्षेचे हॉलतिकिट महाआयटी कडून उमेदवारांच्या ईमेल वर पाठविण्यात आलेले आहेत. तरी उमेदवारांनी परीक्षेसाठी येताना या कार्यालयाकडून मैदानी चाचणीच्या वेळी देण्यात आलेले ओळखपत्र, महाआयडीकडून लेखी परिक्षेसाठी दिलेले हॉलतिकीट, ०२ पासपोर्ट साईज फोटो सोबत घेवून यावेत. उमेदवारांना या कार्यालयाकडून पॅड व काळे पेन देण्यात येणार असून याव्यतिरिक्त उमेदवारांनी त्यांचेसोबत इतर कोणत्याही वस्तू उदा. पेन, पेन्सिल, खोडरबर, मोबाईल, डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मायक्रो कॅमेरा डिव्हाईस, कॅलक्युलेटर, डिजीटल नोटपॅड, नोटस पुस्तके, ईअरफोन, हिअरिंग एंड डिव्हाईस, स्मार्ट वॉचेस, स्मार्ट आय ग्लासेस, चिप इत्यादी वस्तू आणू नयेत.
- उमेदवारांनी लेखी परिक्षेसाठी दि.१५ मार्च २०२६ रोजी परिक्षा केंद्रावर सकाळी ८.०० वाजता उपस्थित रहावे. उशिरा आलेल्या उमेदवारांना लेखी परिक्षेसाठी बसु दिले जाणार नाही, तरी उमेदवारांनी लेखी परिक्षेसाठी वेळेत उपस्थित रहावे. तसेच उमेदवारांनी परिक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचे कॉपी करण्याचा प्रयत्न करु नये. जर उमेदवार कॉपी करताना आढळून आल्यास त्यांचेविरुध्द महाराष्ट्र स्पर्धा परिक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) अधिनियम २०२४ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.










