सोलपूर ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांच्या जिर्णोद्धारासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महत्त्वपूर्ण धार्मिक आणि पर्यटन विकास प्रकल्पासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.याचबरोबर, शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी १४ कोटी रुपयांचा विशेष निधी देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा आमदार कोठेंवर आपली मर्जी दाखवली आहे.
२०२४-२५ मध्ये १२ कोटींचा निधी दिल्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी मिळालेल्या या निधीमुळे सोलापूर शहर विकासाला गती मिळणार आहे.अधिवेशनादरम्यान आमदार कोठे यांनी मांडलेल्या प्रस्तावात “सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांचा परिसर विकसित करून पर्यटन व धार्मिक वारशाला चालना देता येईल,” — असे प्रतिपादन केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निधीची तातडीने मंजुरी दिली.६ कोटी ८० लाख रुपयांच्या प्रस्तावापैकी पहिल्या टप्प्यात २ कोटी रुपये देण्यात आले असून उर्वरित टप्प्यांसाठी नियोजन सुरू आहे.
याशिवाय, नव्या १४ कोटींच्या निधीतून ४५ प्रमुख रस्ते व अंतर्गत रस्त्यांचे कामे हाती घेतली जाणार आहेत.सिद्धरामेश्वर भक्तमंडळाकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून “बाराव्या शतकातील योगी कुलचक्रवर्ती सिद्धरामेश्वरांच्या कार्याला आधुनिक विकासाच्या माध्यमातून उजाळा देणारा हा उपक्रम आहे,” अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

आ. देवेंद्र कोठे म्हणाले —“चोहोबाजूंनी तलावाने वेढलेला सिद्धरामेश्वर मंदिर परिसर केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आहे. मंदिरासोबतच सिद्धरामेश्वरांनी निर्माण केलेल्या ६८ लिंगांचा विकास करणे हा माझा संकल्प होता. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तो पूर्ण करण्यासाठी निधी मंजूर करून दिला, ही माझ्यासाठी जबाबदारी आणि अभिमानाची गोष्ट आहे.”







