No Result
View All Result
शिक्षण विभागाकडून प्रभावी अंमलबजावणीवर मार्गदर्शन; शैक्षणिक सहभाग वाढविण्यावर भर
सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये दि. ५ सप्टेंबर २०२६ पासून राबविण्यात येत असलेल्या ‘चला, शाळेत जाऊया’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सोलापूर जिल्ह्यात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर येथे ही कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शाळेतील सहभाग वाढविणे, शाळाबाह्य अथवा अनियमित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे तसेच शाळा आणि समाज यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यशाळेत अभियानाची उद्दिष्टे, प्रभावी अंमलबजावणीची कार्यपद्धती आणि विविध स्तरांवर करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शाळा, शिक्षक, पालक आणि समाज यांच्या सहभागातून अभियान अधिक व्यापक करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.‘चला, शाळेत जाऊया’ अभियान केवळ विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यापुरते मर्यादित न ठेवता त्यांचा शैक्षणिक प्रवास सातत्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले.
कार्यशाळेमुळे अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधितांना दिशा मिळाली. या कार्यशाळेस शिक्षण संचालक महेश पालकर, शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते..
No Result
View All Result