सोलापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले असून येत्या सोमवारपासून नियुक्त कर्मचारी पदभार स्वीकारतील, अशी माहिती शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी माहिती दिली.

या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात जवळपास ३५० शाळा व ३ हजारांहून अधिक शिक्षक कार्यरत असताना या कार्यालयाला पूर्णवेळ अधीक्षकही नाही व पुरेसे कर्मचारीही नाहीत. गेल्या दीड वर्षापासून केवळ एकाच महिला कर्मचाऱ्यावर या कार्यालयाचे कामकाज चालते. परिणामी शिक्षकांची अनेक कामे खोळंबली आहेत. तसेच प्राथमिक शाळा संयुक्त कृती समितीचे नेते सुनील चव्हाण यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. यासंदर्भात ‘संचार’ने गुरुवारच्या अंकात वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्तातून कर्मचाऱ्यांअभावी शिक्षकांची होत असलेली परवड मांडली होती. या वृत्ताची दखल घेत शिक्षण उपसंचालक डॉ. मोरे यांनी वेतन पथकाला तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली आहे.
आता अधिकचे दोन कर्मचारी मिळणार असल्याने रखडलेली शिक्षकांची कामे मार्गी लागतील. यामुळे शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.







