सोलापूर : गोवा आणि मुंबई या मार्गावरील यशस्वी विमान सेवेनंतर आता सोलापूर-पुणे मार्गावरही हवाई सेवा सुरू होणार आहे. ही सेवा स्टार एअर कंपनीकडून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर विमान सेवा व्यवस्थापक अंजनी शर्मा यांनी दिली.
सध्या फ्लाय ९१ कंपनीकडून सोलापूर-गोवा दरम्यानची विमान सेवा नियमित सुरू असून स्टार एअरकडून सोलापूर-मुंबई विमान सेवा देखील यशस्वीपणे सुरू झाली आहे. या सेवेला सोलापूरकरांकडून प्रतिसाद मिळत आहे. येत्या काही दिवसांत सोलापूर-मुंबई दरम्यान दररोज उड्डाण सुरू होणार असल्याचेही सांगण्यात आले. शर्मा यांनी पुढे सांगितले की, सोलापूर-पुणे उड्डाणासाठी आवश्यक सर्व तांत्रिक व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. मात्र पुणे विमानतळावर स्लॉट उपलब्ध नसल्यामुळे ही सेवा काही महिन्यांनी सुरू होणार आहे. या सेवेमुळे औद्योगिक आणि आर्थिक विकासाला दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.







