सोलापूर: 1 ऑक्टोबर येथील शरदचंद्र पवार प्रशालेतील माता पालक अतिशय कष्टातून,खडतर परिस्थितीतून प्रवास करत आपला संसाराचा गाडा हाकणाऱ्या, प्रसंगी मोलमजुरी,धुणी-भांडी,पडेल ते काम करून संसाररूपी रथाचे एक चाक मोडलेले असतानाही स्वतःच्या खांद्यावर पूर्ण भार घेऊन आपल्या पाल्यांना शिक्षण देण्यासाठी धडपडणाऱ्या माता पालकांचा शरदचंद्र पवार प्रशालेच्या वतीने दरवर्षी नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
यावर्षीही अशाच कष्टाळू, होतकरू, ध्येयाने प्रेरित माता पालकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मनोहरपंत सपाटे , संस्थेचे संचालक ज्ञानेश्वर सपाटे, संचालिका सौ. रेखाताई सपाटे उपस्थित होते. पंढरपूर येथील स्वेरी इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य बी पी रोंगे , रोटरी क्लब सोलापूरच्या अध्यक्ष धनश्री केळकर, डॉ आनंदी जगदाळे, उद्योजिका मानसी गोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी कार्यक्रमाचा हेतू सांगताना कष्टकरी, मजूर महिलांचा सन्मान झाला पाहिजे , त्यांच्या कष्टाप्रती आदर व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम गेल्या आठ वर्षापासून घेऊन प्रत्येक वर्षी नऊ माता पालकांचा सन्मान करीत असल्याचे सांगितले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्वेता भालशंकर, सूत्रसंचालन सुलक्षणा भरगंडे व आभार अर्चना शिंदे यांनी मानले.







