सोलापूर : येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार व जिल्हा रुग्णालयात यापूर्वी रुग्णांचे बेडशीट बदलत नाहीत, अशा प्रकारच्या तक्रारी होत असत. या तक्रारी वाढू लागल्याने व संसर्गजन्य आजारांचा धोका इतर रुग्णांना होऊ नये म्हणून शासकीय व जिल्हा रुग्णालयात यापुढे नियमितपणे बेडशीट व उशीचे कव्हर बदलले जाणार असून त्याची तयारी रुग्णालय प्रशासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत.शासकीय व जिल्हा रुग्णालयासाठी प्रत्येकी पाचशे नवीन बेडशीटचे ऑर्डर देण्याची प्रक्रिया सुरू आहे. संसर्गजन्य आजारांचा वाढता धोका लक्षात घेऊन या पुढील काळात या रुग्णालयांमध्ये नियमितपणे दरदिवशी वेगवेगळ्या रंगांच्या बेडशीटस्चा वापर करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. यामुळे, वापरलेली वेडशीट वेळीच ओळखता येणार आहे. रुग्णालयातील स्वच्छतेचे निरीक्षण अधिक सोपे होणार आहे. येथील शासकीय रुग्णालयात दररोज जवळपास साडेसातशे रुग्ण विविध आजारावर उपचार घेण्यासाठी दाखल होतात. तसेच दोनशेपेक्षा जास्त रुग्णांवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात.ऑपरेशन झाल्यानंतर संबंधित वॉर्डमध्ये दररोज बेडशीट बदलले जातात. इतरत्र ही याची अंमलबाजवणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे, रुग्णाला मानसिकदृष्ट्या बरे वाटणार आहे.
सोमवारी व गुरुवारी पांढरी, मंगळवारी व शुक्रवारी रोजी हिरवी तर बुधवारी आणि शनिवार या दिवशी गुलाबी रंगाची बेडशीट वापरण्यात येणार आहे. यावरून, जुन्या व नवीन बेडशीटची वेळीच ओळख होईल. नवीन वेडशीट हे मशिनद्वारे धुतले जाणार आहेत. माणसाशिवाय या रुग्णालयातील सर्व कपडे यांत्रिक पद्धतीने धुतले जाणार आहेत. या नव्या पद्धतीमुळे रुग्णांना वेळीच धुतलेले बेडशीट देता येणार आहेत. रोज स्वच्छ धुतलेले बेडसीटमुळे आंतररुग्ण विभागात चांगले वातावरण तयार होणार आहे. शिवाय, संसर्गजन्य घटकांचा धोका कमी होणार आहे. यामुळे रुग्णसेवेतील दर्जेदारपणात भर पडेल.
शासकीय रूग्णालयामध्ये शहर जिल्ह्यासह परिसरातील रुग्णांचा ओढा आहे. रोज साडे सातशेहून अधिक रुग्ण येथे उपचारासाठी दाखल होतात. त्यांना येथे उच्च दर्जाची आरोग्य सेवा दिली जाते. नियमितपणे वेडशीट बदलण्यासाठी व रुग्णांनाही बरे वाटण्यासाठी नवीन बेडसीट घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
डॉ. ऋत्विक जयकर, अधिष्ठाता


येथील महिला व बालसह जिल्हा रुग्णालय हे शंभर बेडचे आहे. येथील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा दिली जाते. तसेच, स्वच्छतेसाठी व रुग्णाच्या मानसिकतेचा विचार करून बेडशीट नियमितपणे बदलले जाण्याचा निर्णय घेतला असून, तशी तयारीही रुग्णालयाच्या प्रशासन स्तरावरून नवीन बेडशीट घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा शल्यचिकित्सक







