सोलापूर, 24 नोव्हेंबर 2025 : पीबीएमए चे एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटल,पुणे आणि संकरा आय फाऊंडेशन, युएसए च्या सहयोगाने लवकरच शंकरशेठ साबळे आय हॉस्पिटल हे अद्ययावत नेत्रचिकित्सा रुग्णालय सोलापूर मध्ये सुरु करण्यात येणार आहे. खेड,बार्शी रोड येथे दोन एकर प्लॉट मध्ये 54,000 चौरस फुट अशा प्रशस्त जागेत हे रुग्णालय विस्तारलेले आहे. या सुविधेचा उद्देश सोलापूर व आसपासच्या भागांसाठी आधुनिक व उच्च-गुणवत्तेच्या नेत्रचिकित्सा सेवा प्रदान करणे आहे.ही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. याप्रसंगी पीबीएमएच्या एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटलचे चेअरमन नितीन देसाई, उपाध्यक्ष सुधीर साबळे, कार्यकारी संचालक परवेझ बिलिमोरिया, मुख्य वैद्यकीय संचालक डॉ.राहुल देशपांडे, शंकरशेठ साबळे आय हॉस्पिटलच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.रेश्मा मेहता, सहयोगी संचालक सुधीर सुधाळ व दाता कुटुंबीयांपैकी अरुण साबळे उपस्थित होते.
एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटल हे भारतातील आघाडीच्या टर्शरी आय केअर हॉस्पिटल्स पैकी एक आहे. संकरा आय फाउंडेशन (यूएसए) ही अमेरिकेतील एक प्रतिष्ठित धर्मादाय संस्था असून टाळण्याजोगे अंधत्व दूर करण्याच्या आपल्या ध्येयासह भारतातील नेत्रसेवा उपक्रमांसाठी बहुमूल्य योगदान देत आहे.
२५ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या रुग्णालयाच्या औपचारिक उद्घाटन समारंभाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून संकरा आय फाऊंडेशन, युएसए चे विश्वस्त दिव्योगी पटेल आणि सन्माननीय पाहुणे म्हणून कल्पतरू फाउंडेशन, यूएसए चे संचालक अमोल कुलकर्णी आणि प्रतिभा बाचल हे उपस्थित राहणार आहेत. यांसह संकरा आय फाऊंडेशन, युएसएच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य वेंकट मद्दीपति, पीबीएमएच्या एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटलच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य आणि एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटलचे चेअरमन नितीन देसाई, अध्यक्ष राजेश शहा, उपाध्यक्ष सुधीर साबळे, उपाध्यक्ष मनीष जैन, सचिव राहुल राठी, खजिनदार मयुर व्होरा आणि चंद्रकिशोर व्होरा व धनराज पाटील,तसेच एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटलच्या संचालक मंडळाचे सदस्य व एच.व्ही देसाई आय हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक परवेझ बिलीमोरिया, मुख्य वैद्यकीय संचालक डॉ.राहुल देशपांडे आणि वैद्यकीय संचालक डॉ.कुलदीप डोळे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. या रुग्णालयाची जागा ही सोलापूर येथील श्री. कुमार कराजगी यांनी दान केली असून प्रमुख दात्यांमध्ये श्री. सुधीर साबळे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. या पुढाकाराला संकरा आय फाऊंडेशन, युएसएचे प्रमुख सहकार्य लाभले आहे. जागतिक दर्जाची सुविधा,अग्रगण्य नेत्रतज्ज्ञ आणि कुशल कर्मचाऱ्यांच्या टीमने हे रुग्णालय सुसज्ज आहे. सुरुवातीला, येथे व्यापक नेत्र तपासणी, निदान सेवा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया या सेवा दिल्या जाणार आहेत. औपचारिक उद्घाटनानंतर रुग्णालयातील सेवा टप्प्याटप्प्याने विस्तारित केल्या जाणार आहेत.

चार मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स ने सुसज्ज ही सुविधा टाळण्याजोगे अंधत्व दूर करण्यासाठी समर्पित असून सोलापूर भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू रुग्णांसाठी मोफत किंवा किफायतशीर दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रदान करेल. कार्यान्वित झाल्यापासून, अल्पावधीतच येथे १,००० हून अधिक शस्त्रक्रियांचा,मुख्यतः मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा,महत्त्वपूर्ण टप्पा पार करण्यात आला असून, जागतिक दर्जाची नेत्रसेवा सर्वांपर्यंत पोहोचविण्याची संस्थेची दृढ वचनबद्धता दर्शवते. ही सुविधा केवळ सोलापूरमधील रुग्णांनाच नव्हे तर धाराशिव, बीड, लातूर, परभणी आणि कर्नाटकातील जवळपासच्या जिल्ह्यांमधील रुग्णांना देखील सेवा देईल. सोलापूरमध्ये प्रगत नेत्रसेवा उपलब्ध झाल्यामुळे या भागातील लोकांना आता नेत्र उपचारांसाठी पुणे किंवा मुंबईला प्रवास करण्याची गरज राहणार नाही.
रुग्णालयाच्या इमारतीचे दोन्ही ब्लॉक,आजूबाजूचा परिसर आणि आतील रचना प्रशस्त असून रुग्ण-केंद्रित दृष्टीकोनातून तयार करण्यात आले आहे, ज्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या सोबत येणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना आराम मिळणार आहे. एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटलचे विश्वस्त व उपाध्यक्ष सुधीर साबळे म्हणाले की, एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटल ची स्थापना २००० साली झाली असून नेत्रचिकित्सेमध्ये एक आघाडीची संस्था म्हणून ओळखली जाते. संस्थेचे पुण्यात टर्शरी केअर हॉस्पिटल असून नंदुरबार येथे विस्तार केंद्र, त्याचबरोबर ४१ व्हिजन सेंटर्स कार्यरत आहेत.आजवर संस्थेने ८५०,००० हुन अधिक नेत्र शस्त्रक्रिया केल्या असून त्यापैकी ५५०,००० ह्या मोफत केल्या आहेत.
१९९८ मध्ये सॅन फ्रॅन्सिस्को बे एरियामध्ये स्थापन झालेल्या संकरा आय फाउंडेशन (एसईएफ), यूएसएने कोइम्बतूरमधील एका रुग्णालयाला पाठिंबा देऊन आपले ध्येय सुरू केले; त्यानंतर संस्थेने कार्याचा विस्तार करत १४ भारतीय राज्यांमध्ये 29 रुग्णालयांचे जाळे उभे केले असून गेल्या वर्षी एकत्रितपणे ४,५०,००० हून अधिक मोफत नेत्र शस्त्रक्रिया केल्या आहेत.आपल्या व्हिजन २०३० उपक्रमाद्वारे, एसईएफ, यूएसए चे उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या शाश्वत प्रारूपाचा वापर करून दरवर्षी १० लाख मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्याचे आहे, ज्यामध्ये ७०% शस्त्रक्रिया मोफत आणि ३०% सशुल्क असतील,ज्यामुळे संस्थेची दीर्घकालीन स्वयंपूर्णता सुनिश्चित होते.उत्कृष्टता आणि पारदर्शकता प्रति आपली बांधिलकी अधोरेखित करत संकरा आय फाउंडेशन ने सलग १४ वर्षे चॅरिटी नॅव्हिगेटर कडून ४ स्टार रेटिंग मिळविले आहे. यामुळे ही संस्था आघाडीच्या ३ टक्के संस्थांपैकी एक गणली जाते.







