कुटुंबीयांचा पोलिसांपुढे आक्रोश
सोलापूर : बार्शीत वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाल कंटाळून प्रकाश बाविस्कर या ग्रामसेवकाने आत्महत्या केल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पीडित कुटुंबीयांनी न्यायासाठी पोलिसांत धाव घेतली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखला करता येत नसल्याचे सांगतिले. पीडित ग्रामसेवकाच्या कुटुंबीयांनी जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे म्हटले. त्यामुळे, काही काळ बार्शी ग्रामीण रुग्णालयात चांगलाच तणाव झाल्याचं पाहायला मिळालं. उपमुख्य अधिकाऱ्यांच्या नावाने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी आम्हाला गुन्हा दाखल करता येणार नाही, तुम्ही रितसर जबाब नोंदवा, असे येथील पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी म्हटले. मात्र, कुटुंबीय गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर ठाम आहेत.
वरिष्ठ अधिकारी सातत्याने छळत असल्याने आणि पैशाची मागणी करत असल्याने या जाचाला कंटाळून बार्शीत ग्रामसेवकाने गळफास लावून आपले जीवन संपविल्याची खळबळजनक घटना घडली आहे. वरीष्ठांचा जाच आणि कर्मचाऱ्यांचा छळ हे अलिकडच्या काळात वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. प्रकाश बाविस्कर असे या ग्रामसेवकाचे नाव आहे. आता या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जोपर्यंत गुन्हा दाखल केला जात नाही, तोर्यंत बॉडी ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा बाविस्कर कुटुंबीयांनी घेतला आहे. त्यावरुन, रुग्णालयात बराच काळापासून तणावाचे वातावरण दिसून आले.

दरम्यान, पोस्टमार्टेमसाठी त्यांचा मृतदेह रूग्णालयात नेण्यात आला आहे. पण कुटुंबीयांना पोस्टमार्टम करण्यापूर्वी विचारणा देखील करण्यात आली नाही. याशिवाय जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यात येणार नाही, अशी भूमिका संतप्त कुटुंबीयांनी घेतली आहे. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले आहे.







