सोलापूर : महाविकास आघाडीतील काँग्रेस, ठाकरे यांची शिवसेना, मनसे, शरद पवार यांची राष्ट्रवादी, माकप, समाजवादी पार्टी या घटक पक्षांनी आगामी महापालिका निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे.रविवारी, हॉटेल सिटी पार्क येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आघाडी करून निवडणूक लढविण्यावर शिक्कामोर्तब झाले. या बैठकीत सोलापूर महापालिकेची निवडणूक चारही पक्षांनी एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला.
आता महापलिकानिवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच जागा वाटपाची बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.या बैठकीला काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, प्रकाश यलगुलवार, माजी महापौर संजय हेमगड्डी, प्रवक्ते प्रा. अशोक निंबर्गी, शिवसेना (उबाठा) उपनेत्या अस्मिता गायकवाड, समन्वयक पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, प्रा. अजय दासरी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेश गादेकर, माजी अध्यक्ष भारत जाधव, प्रदेश सरचिटणीस शंकरपाटील, दत्ता माने, माकपचे सचिव मेजर युसूफ शेख, नलिनी कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी, नसीमा शेख, मनसेचे प्रशांत इंगळे, समाजवादी पार्टीचे अबुतालीब डोंगरे उपस्थित होते.दरम्यान, सर्वच पक्षांनी सकारात्मक भूमिका घेतली असून एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीबाबत सर्वजण सकारात्मक आहेत.
लवकरच जागा वाटप होईल, असा विश्वास शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेश गादेकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी व्यक्त केला.










