महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल निर्माण करणारी घटना घडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अचानक ‘मातोश्री’वर दाखल झाले. विशेष म्हणजे, गेल्या तीन महिन्यांतील ही त्यांची दुसरी भेट आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशाच्या कार्यक्रमानंतर राज ठाकरे थेट मातोश्रीवर पोहोचले. काही वेळातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील तेथे दाखल झाले आणि दोन्ही बंधूंमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या भेटीमुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता रंगू लागल्या आहेत.
कार्यक्रमानंतर घडलेले हे आगळेवेगळे दृश्य सर्वांच्या नजरा खेचणारे ठरले. संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमातून राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या आधीच बाहेर पडले, आणि काही मिनिटांतच ‘मातोश्री’वर दाखल झाले. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे देखील मातोश्रीवर पोहोचले. या वेळी राज ठाकरेंसोबत पत्नी शर्मिला ठाकरे होत्या, तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे होते. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही बंधूंमधील चर्चा ‘मातोश्री’च्या पहिल्या मजल्यावर शांत वातावरणात झाली. चर्चेचा विषय उघड न झाल्याने राजकीय वर्तुळात विविध अंदाज वर्तवले जात आहेत. मात्र, दोन्ही कुटुंबांमधील वाढती जवळीक पाहता ठाकरे बंधूंचे संबंध नव्या अध्यायाकडे वळत आहेत, अशी चर्चा सुरू आहे.
बारशाच्या कार्यक्रमात ठाकरे कुटुंबियांचा एकत्रित फोटो
कार्यक्रमात घडलेले एक आगळेवेगळे दृश्य विशेष लक्षवेधी ठरले. बारशाच्या कार्यक्रमात ठाकरे कुटुंबियांनी एकत्रित फोटो काढला, ज्यात राज ठाकरे यांच्या शेजारी आदित्य ठाकरे उभे असल्याचे चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. कार्यक्रमात उद्धव आणि राज ठाकरेंनी एकमेकांशी संवाद साधला, तसेच संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांशीही मनमोकळा संवाद झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रसंगी दोन्ही घराण्यांची कौटुंबिक एकजूट आणि पारंपरिक आत्मीयता पुन्हा एकदा सर्वांसमोर आली.







