सोलापूर : सोलापुरातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्या प्रकरणातील चार फरार संशयितांना साताऱ्यातील तळबीड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे टोलनाक्यावर शनिवारी रात्री फरार संशयितांच्या अटकेचा सिनेस्टाईल थरार पाहायला मिळाला. नाकाबंदी करून चारही आरोपींना पकडण्यात आले. मोटारीने साताऱ्याकडून कराडकडे जात असताना ते पोलिसांच्या सापडले. त्यांना सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.
तासवडे (ता. कराड) टोलनाक्यावर नाकाबंदी करून तळबीड पोलिसांनी शंकर बाबू शिंदे, सुनील शंकर शिंदे, आलोक तानाजी शिंदे (सर्व रा. रविवार पेठ, सोलापूर) आणि महेश शिवाजी भोसले (रा. माळेवाडी, ता. माळशिरस) या फरार संशयितांना पकडले. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवारीच्या वादातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे (रा. जोशी गल्ली, जुना बोरामणी नाका) यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सोलापुरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमावाने भाजप कार्यालयावर हल्ला चढवत तोडफोड केली होती.
बाळासाहेब सरवदे यांच्या घरातील महिला सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार होत्या. मात्र, ऐनवेळी पक्षाने त्यांचा पत्ता कट करून विरोधकांना उमेदवारी जाहीर केली. त्या कारणावरून दोन गटांत खटके उडत होते. शुक्रवारी (२ जानेवारी) उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यामध्ये मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हत्येच्या घटनेनंतर सोलापुरातील तणाव निर्माण झाला होता. हल्लेखोर फरार झाले होते. सोलापूर शहर पोलीस ठाण्यात १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही जणांना अटकही करण्यात आली. मात्र, चार जण फरार होते. सोलापूर स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) त्यांच्या मागावर होती. फरार संशयित शनिवारी रात्री साताऱ्यातील आनेवाडी टोलनाका परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोलापूर पोलिसांनी सातारा पोलीस अधीक्षकांकडे मदत मागितली. मात्र, संशयित आनेवाडीतून कराडकडे निघाल्याचे समजताच तळबीड पोलिसांना सतर्क करण्यात आले.
सोलापूर एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे यांचे पथक मागावर असल्याची कुणकुण संशयितांना लागली होती. त्यामुळे चौघेही संशयित पोलिसांना गुंगारा देत होते. कराडकडे गेलेल्या संशयितांनी आपली मोटार पुन्हा साताऱ्याकडे वळवली. परंतु, तळबीड पोलिसांनी तासवडे टोलनाक्यावर केलेल्या नाकाबंदीत सर्वजण अडकले आणि पोलिसांनी चौघांच्याही मुसक्या आवळल्या.










