55 महाविद्यालयांतील 1200 हून अधिक विद्यार्थी कलाकारांचा सहभाग
सांगोला, – युवा महोत्सव म्हणजे तरुणाईचा जल्लोष असतो. या जल्लोषातून विद्यार्थी कलाकार आपली अभिव्यक्ती मांडण्याबरोबरच कलेतून प्रबोधन करत असतात. लोककलेच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे घेऊन जाता येतो. आज ओवी, पिंगळा या लोककला लोप पावत चालल्या आहेत. युवा महोत्सवातून नव्या पिढीने लोककला व लोकसंस्कृतीचे जतन केले पाहिजे, असे आवाहन सुप्रसिद्ध लोककलाकार व लोककलेचे अभ्यासक डॉ. योगेश चिकटगावकर यांनी केले.

सांगोला महाविद्यालय, सांगोला येथे आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २१व्या ‘उन्मेष सृजनरंग’ युवा महोत्सवाचा थाटात उद्घाटन डॉ. योगेश चिकटगावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, सचिव उदयबापू घोंगडे, विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, सांगोला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी केले. यावेळी त्यांनी दि. 7 ते 10 ऑक्टोबर 2025 या कालावधीत चालणाऱ्या युवा महोत्सवात नृत्य, नाट्य, ललित, वाङ्मय आणि संगीत विभागातील एकूण 39 कलाप्रकारांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या महोत्सवात सोलापूर विद्यापीठाच्या संलग्नित एकूण 55 महाविद्यालयांचा सहभाग असून, जवळपास 1200 हून अधिक विद्यार्थी कलाकार आपली कला सादर करणार असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना चिकटगावकर म्हणाले, लोककला आणि लोकसंस्कृती म्हणजे आपल्या अस्मितेचे आणि संस्कृतीचे मूळ आहे. काळाच्या ओघात या कला लुप्त होऊ नयेत, यासाठी युवकांनी पुढे येणे गरजेचे आहे. उन्मेषसारखे युवा महोत्सव हे केवळ स्पर्धा नसून, कलाकार घडवण्याची कार्यशाळा आहेत. कलेतून मनोरंजन होण्याबरोबरच प्रबोधन होणे आवश्यक आहे. लोककला, लोकसंस्कृती या मनोरंजनाबरोबरच प्रबोधनाचे महत्त्वाचे साधन आहे. यावेळी चिकटगावकर यांनी जात्यावरील ओवी, पिंगळा सादर करून पूर्वीच्या काळातील संस्कृतीचे दर्शन घडवले. लोककला, लोकसंस्कृती सादर करताना त्यांनी महापुरुषांच्या विचारांचा जागर घातला. त्याचबरोबर स्त्री जन्माचे सर्वांनी स्वागत केले पाहिजे, असे सांगितले. तसेच अल्पकालावधीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने चांगली प्रगती केल्याचे त्यांनी सांगितले. आज सोलापूर विद्यापीठाचे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर उज्वल यश मिळवत असल्याचेही ते म्हणाले.

कुलगुरू डॉ. महानवर म्हणाले की, सोलापूर जिल्ह्याने आज मोठे कलाकार घडवले आहेत. आज त्यांचाच वारसा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने पुढे घेऊन जात आहेत. येथील विद्यार्थ्यांमध्ये कलेची आस्था असण्याबरोबरच एक वारसा देखील आहे. विद्यापीठाचा हा युवा महोत्सव अतिशय दर्जेदार व पारदर्शी होत आहे, त्यामुळेच राष्ट्रीय पातळीवर गतवर्षी घवघवीत यश आपल्या विद्यार्थ्यांनी मिळवल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा म्हटलं की हार, जीत असते. त्यामुळे दोघांचाही अनुभव महत्वाचा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी युवा महोत्सवाचा आनंद लुटावा व आयुष्यात पुढे जावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन संतोष कांबळे व डॉ. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार डॉ. सुरेश भोसले यांनी मानले.







