सोलापूर : शहर व परिसरातील धार्मिक कार्यक्रमांमध्ये हिरीरीने सहभाग नोंदवून आपल्या वक्तृत्वाने सर्वांना खिळवून ठेवणारे प्रसिद्ध व्याख्यान केसरी बसवराजशास्त्री बसय्या हिरेमठ यांचे अल्प आजाराने गुरुवारी निधन झाले. मृत्यूसमयी ते ८६ वर्षांचे होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या (शुक्रवारी) दुपारी चार वाजता हत्तुरे वस्ती ओम नमः शिवाय नगर मधील त्यांच्या राहत्या निवासस्थानापासून निघणार आहे. बसवराजशास्त्री हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिरातील गर्भगृहात गेल्या 65 वर्षांपासून अखंडपणे त्यांनी पोरोहित्याची सेवा केली. तसेच श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेत आध्यात्मिक निवेदन करून ते लाखो भक्तांना खिळवून ठेवत असत.
शहर व परिसरातील प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात ते हिरीरीने सहभाग नोंदवून आपल्या अमोघ वाणीने उपदेश करीत होते. त्यामुळेच काशी पीठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी त्यांना व्याख्यान केसरी ही उपाधी दिली होती. तत्त्वज्ञान विषयात त्यांनी पदवी प्राप्त केली होती. तसेच नवरात्रौत्सवात शिवगंगा मंदिरातील धार्मिक कार्यक्रमात ते सहभागी होत होते. बसवराजशास्त्री यांच्या निधनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.
#northsolapur #solapurkar #solapur #SolapurNews #siddheshwartemple










