सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या ३८ व्या महापौराची निवडणूक लांबणीवर गेली असून आता ३१ जानेवारीऐवजी ६ फेब्रुवारी रोजी सोलापूरला नवा महापौर मिळणार आहे. विभागीय आयुक्तांनी काल सोमवारी महापालिकेला लेखी पत्र पाठवून महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदाची निवडणूक ६ फेब्रुवारी रोजी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी प्रशासकीय स्तरावर जय्यत तयारी करण्यात येत आहे. या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया राबवण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी गणेश नि-हाळी यांची पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज नगरसचिव प्रविण दंतकाळे यांच्याशी निवडणूक प्रक्रिया राबवण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी खबरदारीचे उपाय योजण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.
येत्या २९ जानेवारी रोजी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी होणार आहे. त्यासाठी सर्व ८६ नगरसेवक एकत्रीतपणे पुण्याला जाणार आहेत. शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्यावर ही संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. प्रभाग दोनमधून निवडून आलेल्या नगरसेविका शालन शिंदे तुरुंगात असल्याचे त्या हजर राहू शकत नाहीत. भारतीय जनता पक्षाने महापालिकेत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. महापौर पदाबाबत पक्षात मोठी चुरस आहे. विनायक कोंड्याल, नरेंद्र काळे, अनंत जाधव, डॉ. किरण देशमुख, रंजीता चाकोते, राजकुमार पाटील यांची नावे चर्चेत आहेत.
आमदार देवेंद्र कोठे यांनी कोंड्याल यांच्यासाठी सारी शक्ती पणाला लावली आहे. तर आमदार विजयकुमार देशमुख हे चिरंजीवाला महापौर पदावर बसवण्यासाठी अधीर झाले आहेत. काळे यांना पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा आशीर्वाद आहे. जाधव यांनी मराठा समाजाला न्याय मिळावा ही मागणी घेऊन मुंबई गाठली आहे










