पंढरपूर : वसुबारस पासून दीपावली महोत्सवास सुरवात झाली आहे. परंपरेप्रमाणे धनत्रयोदशीनिमित्त श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत. श्री विठ्ठलास सोने मुकुट, नाम निळाचा, कौस्तुभ मणी, दंड पेट्या जोड मोठा, हिऱ्याचा कंगण जोड, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी २ पदरी, शिरपेच मोठा १० लोलक असलेला, शिरपेच लहान, मस्त्य जोड, तोडे जोड, एकदाणी तुळशीची माळ ३ पदरी इत्यादि अलंकार परिधान करणत्यात आलेले आहेत. तसेच रुक्मिणी मातेस सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा, इत्यादि पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
दिपावलीत वसुबारस, धनत्रयोदशी दिवाळी पाडवा, नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तुकाराम भवन, श्री. ज्ञानेश्वर दर्शन मंडप व भक्त निवास आदी ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असल्याचे मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी सांगितले. प्रतिवर्षीप्रमाणे श्री. विठ्ठल व रुक्मिणी मातेस पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत. सदरचे अलंकार पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.








