जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर येत्या 2 नोव्हेंबर रोजी जालन्याच्या आंतरवाली सराटीत बैठक बोलावण्याची घोषणा केली आहे. या प्रकरणी त्यांनी सर्वच शेतकरी नेत्यांना व शेतकऱ्यांच्या प्रश्नांत रस असणाऱ्या लोकांना या बैठकीला येण्याचे आवाहन केले आहे. प्रस्तुत बैठकीत शेतकऱ्यांच्या कोणत्या मागण्यांवर लढा द्यायचा व जिंकायचा यावर चर्चा केली जाईल. कारण, शेतकऱ्यांना वारंवार पळवण्यात काही मजा नाही. शेतकरी आमच्या आंदोलनात पूर्ण ताकदीने उतरेल. आपली पूर्ण क्षमता दाखवेल, असे ते म्हणालेत.

मनोज जरांगे यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर 2 नोव्हेंबर रोजी आंतरवाली सराटीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या मुद्यावर आम्ही 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वा. आंतरवाली सराटीत एका खास बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीचे निमंत्रण आमच्या लोकांनी सर्वच शेतकरी संघटनांचे राष्ट्रीय अध्यक्ष, संस्थापक, नेते, पदाधिकारी, अभ्यासक, आमदार, माजी आमदार, माजी खासदार, माजी मंत्र्यांना दिले आहे. या प्रकरणी सर्वांशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे सर्वजण आमच्या बैठकीला येतील असा आम्हाला विश्वास आहे.
या प्रकरणी राजू शेट्टी, रविकांत तुपकर, सदाभाऊ खोत, पाशा पटेल, जयंत पाटील, शंकरअण्णा धोंडगे, बच्चू कडू आदी सर्वच नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे ते म्हणाले.







