सोलापूर : शहरातून गहाळ झालेले विविध कंपनीचे सुमारे ४६ लाख २० हजाराचे एकूण २३१ मोबाइल हॅन्डसेट हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाद्वारे गहाळ झालेल्या व चोरीस गेलेल्या मोबाइल हॅन्डसेटची माहिती मिळण्यासंदर्भात सीईआयआर पोर्टल सुरु करण्यात आले आहे. सदरील पोर्टलद्वारे व तांत्रिक विश्लेषणाद्वारे शहरातून गहाळ झालेल्या मोबाइल हॅन्डसेटची माहिती प्राप्त करुन घेऊन त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडील तपास पथके वेगवेगळ्या परजिल्ह्यात व परराज्यात पाठविण्यात आली होती. सदरील तपास पथकातील पोलीस अंमलदारांनी पोर्टल व तांत्रिक विश्लेषणाद्वारे अतिशय कुशलतेने तपास करून गहाळ झालेले विविध कंपनीचे सुमारे ४६ लाख २० हजारांचे एकूण २३१ मोबाइल हॅन्डसेट हस्तगत केले आहेत. नागरिकांनी आपल्या गहाळ मोबाइलचा शोध होण्यासाठी ceir.gov.in या वेबसाईटवर जाऊन माहिती भरुन सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अश्विनी पाटील, सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार महंमद रफिक इनामदार, संतोष पापडे, एकनाथ उबाळे, शंकर भिसे, समाधान मारकड, संतोष वायदंडे, कल्लप्पा देकाणे, खाजप्पा आरेनवरु, दत्ता मोरे, सुधाकर माने आदींनी केली आहे.







