सोलापूरः यंदा महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय झालाच तर सर्व १०२ जागांवर निवडणुका लढून जिंकण्याची तयारी ठेवा. महायुती म्हणून निवडणुका लढवण्याचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री स्तरावरून होईल असे मत राज्याचे कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीसाठी ते सोलापुरात आले असता ते शासकीय विश्रामगृहातील बैठकीत कृषिमंत्री भरणे बोलत होते. यावेळी कृषिमंत्री भरणेसह जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, शहराध्यक्ष संतोष पवार, आनंद चंदनशिवे, किसन जाधव, लतीफ तांबोळी, तौफिक शेख, मकबुल, किरण मोहोळकर, माशाळे, चंद्रकांत दायमा, व्हनमाने, बसवराज बगले, प्रमोद भोसले सह अन्य उपस्थित होते.

कृषिमंत्री भरणे म्हणाले की, पक्षाकडून स्वतंत्रपणे पालिकेची निवडणूक लढण्याचे ठरले. तर आपली १०२ जागांवरील तयारी असावी. प्रत्येक प्रभागात ताकतीचा उमेदवार निवडा. उमेदवार निवडतांना जिंकून येण्याचे निकष देखील आवर्जून पाहणे गरजेची आहे. महायुती म्हणूनच ही निवडणूक होईल. मात्र याबाबतचे निर्णय हे राज्याचे मुख्यमंत्र्यांसह दोनही उपमुख्यमंत्री हे घेतील. इच्छुकांनी जनतेत मिसळावे. लोकांची कामे करा. त्यांच्या अडचणीही सोडवा असेही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सल्ला वजा सूचनाही दिले. शहराध्यक्ष संतोष पवार म्हणाले, प्रभागनिहाय बैठक व प्रभाग यात्रा काढण्यात येणार आहे. निवडून येणाऱ्या उमेदवाराचे क्रमही ठरवली जाईल. पक्षाकडून कार्यकर्त्यांना निष्ठेच फळ मिळणारच आहे. २६ प्रभागातील उमेदवार निश्चितीही सुरू आहे. यंदाचे पक्षाचे जास्त उमेदवार निवडून येतील याची काळजी घेऊ.
कृषिमंत्री भरणे हार स्विकारलाच नाही..
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे सोलापुरात येणार असल्याने त्यांचे किलोचा हार क्रेनने घालून स्वागत व सत्कार करण्यासाठी नशीब शेख यांनी आणला होता. पण, यंदा राज्याला महापूराचा फटका बसला असून यात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेख यांनी सत्कारासाठी आणलेला हार कृषीमंत्री भरणे यांनी स्वीकारला नाही.







