सोलापूर ; कॉपीमुक्त परीक्षा राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला असून, ग्रामीण भागातील अनेक परीक्षा केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आवश्यक सुविधा आणि किमान ५०० विद्यार्थ्यांची बैठक क्षमता असलेल्या केंद्रांनाच यापुढे मान्यता देण्यात येणार असून, शहरी भागातील केंद्रांची संख्या वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
- यंदाच्या दहावी व बारावी परीक्षांदरम्यान सीसीटीव्ही, बैठे पथके आणि भरारी पथके असूनही ३०० हून अधिक कॉपीचे गैरप्रकार समोर आले. विशेषतः ग्रामीण भागातील केंद्रांवर हे प्रकार अधिक प्रमाणात आढळले. त्यामुळेच आता परीक्षा केंद्रांच्या रचनेत आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. यापूर्वी जिल्हास्तरावर अधिकाऱ्यांकडून केंद्रांची पाहणी करून अहवाल सादर करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात अनेक केंद्रांवर आवश्यक सुविधा नसल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर आता बोर्डाचे अधिकारीच राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांची थेट पडताळणी करणार आहेत. सीसीटीव्ही व्यवस्था, सुरक्षित वॉल कंपाउंड, पिण्याच्या पाण्याची सोय आणि बैठक क्षमता या निकषांवर केंद्रांची तपासणी केली जाईल. अपुऱ्या सुविधा असलेल्या केंद्रांची मान्यता रद्द केली जाणार आहे.
- राज्यात पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण असे एकूण नऊ विभाग आहेत. बारावी परीक्षेत कोकण वगळता इतर आठ विभागांत कॉपीचे प्रकार मोठ्या प्रमाणात आढळले, तर दहावी परीक्षेतही अनेक केंद्रांवर गैरप्रकार उघडकीस आले. शहरी भागात परीक्षा केंद्रे असल्यास पोलिस बंदोबस्त तत्काळ उपलब्ध होतो आणि भरारी पथकांना नियमित तपासणी करणे सुलभ होते. त्यामुळेच कॉपीमुक्त परीक्षेसाठी शहरी भागातील केंद्रांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सध्या ग्रामीण भागात सुमारे ४० टक्के तर शहरी भागात ६० टक्के परीक्षा केंद्रे आहेत.
- मात्र, आगामी काळात शहरी केंद्रांचे प्रमाण आणखी वाढविण्यात येणार आहे. तसेच, सध्या २५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या केंद्रांच्या तुलनेत आता किमान ५०० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली केंद्रेच निश्चित केली जाणार आहेत.यासंदर्भात बोर्डाचे अध्यक्ष, विभागीय अध्यक्ष आणि संबंधित अधिकाऱ्यांची पुढील आठवड्यात बैठक होणार असून, त्यानंतर नव्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
- “केवळ परीक्षा घेणे हा आमचा उद्देश नसून ती पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडणे महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील ज्या केंद्रांवर तांत्रिक त्रुटी आणि गैरप्रकार आढळले आहेत, त्याबाबत बोर्डाने कठोर पवित्रा घेतला आहे. ५०० विद्यार्थी क्षमता आणि सीसीटीव्ही बंधनकारक केल्यामुळे परीक्षेचा दर्जा सुधारण्यास मदत होईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही केंद्राची गय केली जाणार नाही.” सुरेश वाघमारे ; उपशिक्षण अधिकारी, माध्यमिक
- सोलपुरातून परीक्षा गैरप्रकारांची आकडेवारी
- इयत्ता दहावी : ०३ केंद्रांवर १४ गैरप्रकार
- इयत्ता बारावी : ०१ केंद्रांवर ०७ गैरप्रकार
- एकूण कॉपी केस : २१ कॉपी केस
- सामूहिक गैरप्रकार : ००










