नवी दिल्ली : वीर बाल दिनानिमित्त, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी २० मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित केले. ही मुले १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून निवडली गेली होती. त्यापैकी एक बिहारचा १४ वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी आहे. वैभव सूर्यवंशी दिल्लीला पोहोचला आहे, त्यामुळे तो आज विजय हजारे स्पर्धेत मणिपूरविरुद्धचा सामना खेळत नाहीये.
त्यानंतर दुपारी 12:30 वाजता भारत मंडपममध्ये आणखी एका कार्यक्रमात बाल पुरस्कार विजेते आणि देशभरातून आलेले शालेय विद्यार्थी सहभागी होतील. जिथे पंतप्रधान मोदी त्यांना संबोधित करतील. वीर बाल दिवस गुरु गोविंद सिंग यांच्या चार पुत्रांच्या हौतात्म्याच्या सन्मानार्थ आयोजित केला जातो. गुरु गोविंद सिंग यांना तीन पत्नींपासून चार पुत्र होते, ज्यांची नावे अजित, जुझार, जोरावर आणि फतेह अशी होती. त्यांना साहिबजादे असेही म्हटले जाते.
26 डिसेंबर 1705 रोजी चारही पुत्रांची मुघल सैन्याने हत्या केली होती. त्यांच्या हौतात्म्याचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी 2022 मध्ये 26 डिसेंबर हा ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.







