मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर आर्थिक कामकाजाचा घेतला आढावा; तातडीने देयके निकाली काढण्याच्या सूचना
सोलापूर: आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने शासकीय कामांची लगबग वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज जिल्हा कोषागार कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. मार्च अखेरमुळे तिजोरीवर असलेला कामाचा ताण आणि प्रलंबित देयकांची स्थिती जाणून घेण्यासाठी त्यांनी हा दौरा केला.



या भेटीदरम्यान जिल्हा कोषागार अधीक्षक वैभव राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले. मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा अखेरचा टप्पा असल्याने विभागामार्फत करण्यात आलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. विविध विभागांकडून प्राप्त होणारी देयके (Bills) आणि त्यांच्या वितरणाची सद्यस्थिती याबाबत सादरीकरण करण्यात आले.मार्चअखेर प्रणालीवर (System) येणारा ताण लक्षात घेता, कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. शेवटच्या दिवसांत होणारी गर्दी टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या कामाचे नियोजन आणि वाढीव वेळेत सुरू असलेले कामकाज यावर चर्चा झाली.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कोषागार कार्यालयातील विविध विभागांना भेटी देऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. कोणतीही देयके तांत्रिक कारणास्तव प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. निधीचे वितरण करताना नियमांचे काटेकोर पालन करून पारदर्शकता राखावी. इतर सर्व शासकीय विभागांशी समन्वय ठेवून वेळेत देयके सादर करण्याबाबत सूचना द्याव्यात.यावेळी जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मार्चअखेरचे सर्व आर्थिक व्यवहार विहित मुदतीत पूर्ण होतील, असा विश्वास जिल्हा कोषागार अधीक्षक वैभव राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.










