शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयाकडून यंदा राज्यात दहा ठिकाणी कार्यक्रम
सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभाग संचलनालय, मुंबई यांच्यावतीने सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात मंगळवार दि. २१ ऑक्टोबर रोजी मराठीत गाजलेल्या चित्रपट गीतांचा व भावगीतांचा बहारदार ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हे कार्यक्रम राज्यात दहा ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून सोलापूरसह राज्यातील दहा ठिकाणी हे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संचालक बिबीशन चवरे यांनी दिली. हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि आयएएस अधिकारी तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनातून साकारत आहे.

२१ ऑक्टोबर रोजी पहाटे ६:२० वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमात निखिल भालेराव, शशी बासुतकर, वैशाली आगलावे आणि सायली साठे या कलाकारांचा सहभाग असेल. सूत्रसंचालन लक्ष्मीकांत वेदपाठक करत आहे. यासोबत अभंगनृत्य श्रीनि आंबा नृत्यालयाचे श्रीनिवास काटवे आणि त्यांचे विद्यार्थी सादर करतील. हा कार्यक्रम प्रेक्षकांना विनामूल्य पाहता येणार आहे. प्रवेशिका हुतात्मा स्मृती मंदिर येथे उपलब्ध आहेत. या कार्यक्रमास जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विभीषण चवरे संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.







