सोलापूर : बनावट जातीचा दाखला सादर करून निवडणूक लढविल्याप्रकरणी माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यावर कारवाई करावी, तसेच त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करावी, अशी मागणी मूळ तक्रारदार भारत कंदकुरे यांनी जात पडताळणी समितीच्या अध्यक्षांकडे केली. मंजूषा मिसकर यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी राणी ताटे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी महास्वामींच्या बनावट जात प्रमाणपत्रप्रकरणी पहिली सुनावणी घेतली. या सुनावणीत मूळ तक्रारदार भारत कंदकुरे व मिलिंद मुळे यांनी ३५ पानांचे निवेदन सादर करून महास्वामींवर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
महास्वामींच्या वकिलांनी त्यांच्या कागदपत्रांची तहसीलदारांमार्फत फेरतपासणी करण्याची विनंती केली. मात्र, कंदकुरे यांनी यास विरोध दर्शवला. फेरतपासणी आधीच झाल्याचे सांगत त्यांनी पुन्हा तपासाची गरज नसल्याचे नमूद केले. गावकऱ्यांनी जबाब बदलल्याने फेरतपासणीच्या नावाखाली गावकऱ्यांवर दबाव टाकण्याची शक्यता असल्याचा आरोपही त्यांनी केला.










