सोलापूर शहर–जिल्ह्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वीच शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केलेले सुधीर खरटमल यांनी अचानक निवडणूक प्रमुख पदाचा तसेच पक्ष सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी अजित पवार गटाकडून सुधीर खरटमल यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यानच त्यांनी हे पद व पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने पक्षांतर्गत अस्वस्थता उघड झाली आहे. सुधीर खरटमल यांनी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना पाठवलेल्या पत्रात, निवडणूक प्रमुख पदाचा तसेच पक्षाचा राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच या निवडणुकीसंदर्भातील सर्व बाबींमधून व कायदेशीर बाबींमधून कार्यमुक्त करण्याची विनंती त्यांनी केली आहे. या पत्राची माहितीस्तव प्रत राज्यातील व जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना पाठवण्यात आली आहे.दरम्यान, तिकीट वाटपामध्ये झालेला गोंधळ, अंतर्गत समन्वयाचा अभाव आणि स्थानिक पातळीवरील नाराजी यामुळेच हा राजीनामा दिला असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर झालेला हा राजीनामा अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ची निवडणूक रणनीती, संघटनात्मक बांधणी आणि अंतर्गत एकजूट यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पक्षाकडून या राजीनाम्यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसली तरी, निवडणूक काळातच प्रमुख पदाधिकारी बाहेर पडल्याने आगामी दिवसांत राजकीय हालचाली अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.”










