पंढरपूर : कार्तिकी यात्रा सोहळ्याचे औचित्य साधून वाखरी येथील पालखी तळालगत दि.१ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत ‘माऊली कृषी प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी (दि.१) दुपारी ४ वाजता शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
वाखरी येथील पालखी तळावर कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने जनावरांचा मोठा बाजार भरतो. या बाजारच्या शेजारी यंदा प्रथमच गायकवाड ज्ञानेश्वर फाऊंडेशनच्या वतीने ‘माऊली कृषी प्रदर्शन’ भरविण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, रोहयो मंत्री भरत गोगावले, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे विश्वस्त संग्राम गायकवाड यांनी दिली.
चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात शेती उपयोगी वस्तू व उपकरणांचे प्रदर्शन, सर्वोत्कृष्ट जनावरांचे प्रदर्शन तसेच शेतीविषयक अभ्यासकांचे मार्गदर्शन, महिलांसाठी विविध मनोरंजन कार्यक्रम, आरोग्य तपासणी असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शेती अवजारे, बी बियाणे, कीटकनाशके, कृषी तंत्रज्ञान, सहकार चळवळ, ग्रामीण विकास, कृषी शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, सिंचन तंत्रज्ञान, शेतीमाल प्रक्रिया उद्योग, शेती बाजार, आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन, पशुवैद्यकीय सेवा, जैविक शेती, ग्रीन हाऊस आदी विषयांवर काम करणाऱ्या संस्था सहभागी होणार आहेत. प्रदर्शनामध्ये २५० हून अधिक स्टॉल आहेत. या स्टॉलवरून शेतीपूरक विविध उपक्रमाचे प्रदर्शन होणार आहे. शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक गायकवाड यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा







