सोलापूर : महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर करण्याच्या कार्यक्रमात बदल केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आता सोलापूरसह राज्यातील ८ महापालिकांतील ओबीसी व खुल्या प्रवर्गातील आरक्षणाच्या सोडतीही पुन्हा काढण्याचा निर्णय घेतला आहे. ११ जानेवारी रोजी राज्यातील मनपाच्या प्रभागनिहाय आरक्षणाची प्रारुप सोडत जाहीर झाली होती. त्यात ओबीसी प्रवर्गासाठी २७ टक्के आरक्षणानुसार सोडत काढण्यात आली होती.
मात्र आता नवी मुंबई, उल्हासनगर, पनवेल, मालेगाव, जळगाव, सोलापूर, इचलकरंजी आणि जालना या महापालिकांतील ओबीसी व सर्वसाधारण या दोन्ही प्रवर्गातील आरक्षणाची पुन्हा सोडत काढण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यामागचे कारण मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही. आता सोलापूरमधील सोडत १७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे होणार असल्याचे कळवले आहे.
२०१७ मध्ये सोलापूर मनपाची निवडणूक झाली होती. तेव्हा एकूण १०२ नगरसेवकांच्या जागांपैकी ओबीसींसाठी २८ तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५७ जागा आरक्षित झाल्या होत्या. यंदाही त्याच धर्तीवर आरक्षण काढण्यात आली, फक्त प्रभाग बदलले होते. मात्र या बदलात ओबीसींसाठी २८ ऐवजी २७ जागाच आरक्षित ठेवण्यात आल्या. तर सर्वसाधारण प्रवर्गातील एक जागा वाढून त्या ५७ऐवजी ५८ करण्यात आल्या. यात ओबीसी महिलांसाठी १४ तर खुल्या गटातील महिलांसाठी २८ जागा आरक्षित होत्या. ओबीसींची एक जागा घटली तर खुल्या प्रवर्गाची वाढली होती. आता फेररचनेत ओबीसींची जागा वाढवली जाते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या कार्यक्रमास संबंधित जनप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, इच्छुक नागरिक तसेच माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.







