अक्कलकोटच्या कनेक्टिव्हिटीला मिळणार बळकटी
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील दळणवळण आणि धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-बी च्या विस्तार करणासाठी केंद्र सरकारने ३५३.२३ कोटी रुपयांच्या निधीसह प्रशासकीय मंजुरी प्रदान केली आहे. या निर्णयामुळे अक्कलकोट परिसरातील रस्ते विकास आणि आंतरराज्यीय वाहतुकीला मोठी गती मिळणार आहे.
वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी वागदरी येथे बायपास (वळण रस्ता) आणि सांगवी येथे नवीन पुलाच्या बांधकामाला देखील या प्रकल्पांतर्गत मंजुरी देण्यात आली आहे.
आंतरराज्यीय वाहतुकीला या महामार्गामुळे कर्नाटक राज्यातून येणारी जड वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होणार आहे. यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यानच्या व्यापाराला आणि वाहतुकीला चालना मिळेल. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी लातूर, उमरगा तसेच आंध्र प्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. या मार्गाच्या रुंदीकरणामुळे भाविकांचा प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सुरक्षित होणार आहे.

स्वामी भक्तांसाठी मोठा दिलासा : वागदरी येथील बायपासमुळे शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल, तर सांगवी येथील पुलामुळे पावसाळ्यात होणारी गैरसोय दूर होणार आहे.सोलापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील हा रस्ते प्रकल्प जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या कामाला लवकरच सुरुवात होणार असून, यामुळे या भागातील दळणवळणाचे चित्र पूर्णपणे बदलणार आहे.










