सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा दिला संदेश
सोलापूर: पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून मराठा सेवा संघाच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मुस्लिम कर्मचारी बांधवांसाठी ‘रोझा इफ्तार’ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यातून सामाजिक ऐक्य आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) स्मिता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, शिक्षण अधिकारी (प्राथमिक) कादर शेख, कार्यकारी अभियंता (बांधकाम) नरेंद्र खराडे आणि संतोष कुलकर्णी यांनीही या सोहळ्यास उपस्थिती लावली.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम म्हणाले की, “आपण सर्वजण एकाच कुटुंबाचा भाग आहोत. अशा कार्यक्रमांमुळे समाजात बंधुभाव, आपुलकी आणि सामाजिक ऐक्य अधिक दृढ होते. मराठा सेवा संघाचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे.”
या सोहळ्यासाठी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश गोडसे, सचिन साळुंखे, कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेश देशपांडे, दिनेश बनसोडे, प्रदीप सगट, संतोष माने, निलेश देशमुख यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुहास चेळेकर, सुधाकर माने-देशमुख, सुर्यकांत मोहिते, सचिन चव्हाण, चेतन भोसले, आनंद साठे, ममता काशेट्टी, वैशाली रंपुरे, शशिकला सुतार, गौरी कदम, ज्योती माळी यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अनेक कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महताब शेख यांनी केले, तर आभार अविनाश गोडसे यांनी मानले.










