सोलापूर ; केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, सोलापूर-मुंबई विमानसेवेची नागरिकांची मागणी पूर्ण होत आहे, ही सोलापूरकरांना दिवाळीची दिलेली भेट आहे. सोलापूर हे राज्यातील दक्षिण-पश्चिमेकडील महत्वाचा जिल्हा आहे. देवभूमी म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. वस्त्रोद्योगासाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे. विमानसेवेच्या माध्यमातून सोलापूर देशाच्या आर्थिक राजधानीला जोडले जात असल्याने उद्योग-शेती विकासाला चालना मिळून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ‘उडान’ योजनेअंतर्गत ६५ कोटी रुपये खर्च करून विमानतळ टर्मिनल इमारत उभारण्यात आली आहे. सोलापूर-मुंबई विमानसेवेसाठी आर्थिक तूट भरून काढण्यासाठी राज्य शासनाने हमी घेतल्याने ही विमानसेवा सुरू होत आहे.

येत्या काळात हैद्राबाद आणि तिरुपतीसारख्या शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील सर्वाधिक विमानतळ कार्यान्वित असून राज्यातील विमानसेवेचा विस्तार करण्यासाठी आवश्यक सुविधांचा विकास करण्यात येत असल्याचेही श्री.मोहोळ म्हणाले. देशातील पहिले समुद्रातील विमानतळ पालघर येथे उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.








