सोलापूर :सोलापूर महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ (ड) मधील काँग्रेस पक्षाचे उमेदवार कुणाल देविदास गायकवाड यांच्या शपथपत्रात खोटी व अपूर्ण माहिती दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात काल निवडणूक निर्णय अधिकारी तसेच पोलीस विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ही तक्रार ममता कुणाल गायकवाड यांनी दाखल केली असून, त्या उमेदवार कुणाल गायकवाड यांच्या कायदेशीर पत्नी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तक्रारीनुसार, सन २०१७ पासून पतीने आपला त्याग केला असून सध्या सोलापूर कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा दावा प्रलंबित आहे.
या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवजीकृत पुरावे तक्रारीसोबत जोडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, निवडणूक शपथपत्रात उमेदवाराने कौटुंबिक न्यायालयात त्यांच्या ताब्यात असल्याचे मान्य केलेले मंगळसूत्र (जंगम मालमत्ता) लपवली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी कायदा १९५१ अंतर्गत कलम १२३ (२) व १२५ चे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.तसेच सोलापूर न्यायिक दंडाधिकारी न्यायालयात हातउसने रक्कम वसुलीसाठी दाखल असलेल्या काही प्रकरणांबाबत शपथपत्रात “येणे लागू नाही” असे खोटे विधान केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

यामुळे भारतीय दंड संहिता कलम १७१ (डी) व १९३ अंतर्गत गुन्हा होत असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. जाहीर केलेल्या मालमत्तेपेक्षा अधिक संपत्ती लपवली असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.ही तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच राज्य निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली असून, पोलीस आयुक्त, सोलापूर यांच्याकडे फौजदारी तक्रार देण्यात आली आहे. उमेदवारीची छाननी करून ती रद्द करण्याची तसेच तात्काळ गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेमध्ये माहिती सांगताना तक्रारदार सौ. ममता कुणाल गायकवाड यांनी सांगितले की, “लोकशाही प्रक्रियेत पारदर्शकता राखणे अत्यंत आवश्यक असून, निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी.”










