प्रभाग २४ ला दिलासा! पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेचे ‘मिशन ड्रेनेज’ सुरू.
सोलापूर: शहरातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना होणारा जलमय परिस्थितीचा त्रास कायमस्वरूपी दूर करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने कंबर कसली आहे. या प्रभागातील पावसाळी पाण्याचा नाल्याद्वारे निचरा व्हावा, यासाठी नवीन कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली असून, आज सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबसे यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.

या पाहणी दौऱ्यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेविका वनिता पाटील, नगरसेवक मधुसूदन जंगम यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.प्रभाग क्रमांक 24 मध्ये पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरणे किंवा रस्ते जलमय होण्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत होत्या. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नाल्यांचे रुंदीकरण आणि पाण्याचा मार्ग मोकळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

आयुक्तांनी कामाची गुणवत्ता तपासून हे काम पावसाळ्यापूर्वी गतीने पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.यावेळी बोलताना उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी सांगितले की, “नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला होता. आता या कामामुळे पावसाळ्यात होणारा त्रास कमी होईल.”

तर नगरसेविका वनिता पाटील व नगरसेवक मधुसूदन जंगम यांनीही या कामामुळे परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे स्पष्ट केले.या पाहणी दरम्यान महापालिकेच्या आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाच्या तांत्रिक बाबींची माहिती दिली. या कामामुळे प्रभाग क्र. 24 मधील पाण्याचा निचरा जलद गतीने होईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे










