ऐन अडचणीच्या काळात शिक्षकांना आर्थिक आधार; जिल्हा परिषदेकडून वैद्यकीय बिलांची ७ कोटींची ‘दिवाळी’
सोलापूर : गेल्या अनेक महिन्यांपासून वैद्यकीय बिलांच्या प्रतीक्षेत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने माध्यमिक व उच्च माध्यमिक ९३८ शिक्षकांच्या प्रलंबित वैद्यकीय देयकांसाठी सुमारे ७ कोटी रुपयांचा निधी थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केला आहे. यामुळे ऐन अडचणीच्या काळात किंवा आर्थिक नियोजनाच्या वेळी शिक्षकांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील जिल्ह्यातील शिक्षकांचे गंभीर आजार आणि शस्त्रक्रियांची अनेक वैद्यकीय बिले मंजुरीसाठी प्रलंबित होती. या प्रकरणांची फाइल शिक्षण विभाग आणि वित्त विभागाकडे प्रलंबित असल्याने शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.
मात्र, शिक्षण उपसंचालक गणपत मोरे, (माध्यमिक) शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणांचा वेगवान निपटारा करण्यात आला. त्रुटी असलेल्या प्रकरणांची पूर्तता करून घेऊन ९३८ शिक्षकांना न्याय देण्यात आला आहे. मान्यताप्राप्त शाळेतील पूर्णवेळ कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांना वैद्यकीय बिले मिळतात. बिल मंजूर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे शिक्षण विभागाकडे सादर करावी लागतात. आजारातून बरे झाल्यापासून (डिस्चार्ज) ६ महिन्यांच्या आत प्रस्ताव सादर करणे आवश्यक असते. कॅशलेस सुविधेची मागणी प्रलंबित असली, तरी सध्या वैद्यकीय प्रतिपूर्ती पद्धत लागू आहे.










